मुंबई : प्रतिनिधी
गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातून एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच आपापल्या गावी, वाड्या-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक-अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकणवासीयांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसद्वारे १५ हजार ३८८ फे-यांतून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
२३ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे.
अर्थात यासाठी राज्यभरातील विविध आगारांतून आलेले १० हजारांपेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, खरं तर ते कौतुकास्पद आहे, असेही मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
















