चारठाणा : येथील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडचण येत होती. या पार्श्वभुमीवर चारठाणा गणातील पंचायत समिती सदस्य तहेसीन देशमुख यांनी पंचायत समिती मासिक सर्वसधारण सभेत जि. प. सीईओ यांच्याकडे शिक्षकांची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून ७ शिक्षकांना या ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे.
पंचायत समिती सदस्य पद ग्रहण केल्याबरोबर गणातील समस्येचा आढावा घेऊन चारठाण्यातील मुलांना अतिशय उत्तम व दर्जेदार शिक्षण भेटण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंचायत समिती जिंतूरच्या मासिक सर्वसाधारण सभेत दि. ८ एप्रिल रोजीच्या सभेमार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिक्षकांची मागणी केलेली होती. या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चारठाणा उर्दू शाळेला ०५ शिक्षक, पीएम श्री कन्या शाळेला ०१ व प्रशाला चारठाणा येथे ०१ शिक्षक तात्पुरत्या अध्यापन व्यवस्थेसाठी दिले आहेत. यामुळे चारठाण्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
याबद्दल पंचायत समिती सदस्य तहेसीन देशमुख यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. गावातील समस्या तसेच गणातील विविध विकास कामांची वाटचाल अशीच सुरू रहावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिक्षक मिळाल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
















