वडगाव मावळ : संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी असलेल्या देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात गेल्या दोन दिवसांपासून हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना घडलेल्या या प्रकारामुळे वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना दिसत असून, अनेक मासे नदीकिनारी वाहून आले आहेत. काही मासे तडफडत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार नदीतील वाढलेली जलपर्णी, विविध ठिकाणांहून होणारा रासायनिक व सांडपाण्याचा विसर्ग तसेच पाण्याची घटलेली पातळी यामुळे विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असावे. परिणामी मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, देहू परिसरातील अनेक गृहसंकुलांचे सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन काळवंडले आहे. या घटनेमुळे इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरवर्षी आषाढी वारीसाठी लाखो वारकरी देहूनगरीत दाखल होत असतात. परंपरेनुसार अनेक भाविक इंद्रायणी नदीत स्नान करतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून हे पाणी सुरक्षित आहे का, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
















