पुणे : डेंग्यूच्या निदानासाठी करण्यात येणा-या एनएस-१ एलिसा आणि मॅक एलिसा या चाचण्यांसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये. तसेच डेंग्यूच्या निश्चित निदानासाठी कोणत्याही परिस्थितीत जलद रोगनिदान चाचणी किटचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालये व पॅथॉलॉजी प्रयोगशाळांना दिले आहेत.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे आणि आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी याबाबत खासगी रुग्णालयांना पत्राद्वारे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार आणि हिवताप व जलजन्य रोग विभागाचे सहसंचालक यांच्या पत्राच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने सूचना जारी केली आहे. काही खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांकडून डेंग्यू एलायझा चाचणीसाठी ८०० ते १,५०० रुपये शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याची दखल घेऊन आरोग्यसेवा संचालनालयाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य अधिका-यांना शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. सर्व खासगी रुग्णालये, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा तसेच डीएमएलटी संघटनांना शासन निर्णयाची माहिती देणे. डेंग्यू आजारासंबंधी जनजागृती करणे आणि डेंग्यू एलायझा चाचणीसाठी निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास क्षेत्रीय अधिका-यांनी प्रत्यक्ष तपासणी करून अहवाल सादर करावा आणि संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
















