छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबातील दुरावा कायम राहिल्याचे चित्र पुढे आले. आई संगीता व मुलगा कुणाल यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत, तर वडील मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे अन्त्यसंस्कार झाले. या घटनेमागे केवळ मोबाईलच्या थकलेल्या हप्त्याचा वाद होता की, त्यामागे संपत्ती, शेती व नातेसंबंधांतील कौटुंबिक वादांची मोठी पार्श्वभूमी होती, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सततच्या कौटुंबिक वादातून कुणाल चांदगुडे (१९) आत्महत्येच्या उद्देशाने खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला होता. त्याला वाचविण्यासाठी धावलेले वडील मुरलीधर (४८) कुणालसह खोल दरीत कोसळले. डोळ्यांदेखत पती आणि मुलगा दरीत पडल्याचा धक्का सहन न झाल्याने आई संगीता (४२) यांनीही त्याच दरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा कुणाल ‘नीट-यूजी’परीक्षेची तयारी करीत होता. त्याचे वडील मुरलीधर ट्रान्स्पोर्ट कंपनीत चालक होते. काही दिवसांपासून कुणाल व वडिलांमध्ये मतभेद सुरू होते. शुक्रवारी सकाळी क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या कुणालने खवड्या डोंगर गाठला. ही माहिती मिळताच त्याचे आई-वडील व नातेवाईक तिथे पोहोचले. दीड तास मनधरणी सुरू होती. कुणालला पकडण्यासाठी मुरलीधर धावल्यानंतर दोघेही दरीत कोसळले. त्यानंतर संगीता यांनीही दरीत उडी घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा मुरलीधर यांचा मृतदेह त्यांचे चुलत भाऊ अण्णासाहेब चांदगुडे, बहीण शोभा म्हस्के यांच्या ताब्यात दिला. त्यांनी मुरलीधर यांच्यावर मूळ गाव धनगर पिंपळगाव (ता. अंबड) येथे अन्त्यसंस्कार केले.
संगीता व कुणाल यांचे मृतदेह संगीता यांचे वडील बबनराव गाभुड यांच्याकडे दिले. माहेरच्या नातेवाईकांनी दोघांवर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
‘शेरू’च्या वाट्याला एकटेपण
चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर कुणालचा लाडका पाळीव श्वान ‘शेरू’ एकटा पडला आहे. शुक्रवारी रात्रभर खिडकीतून त्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. गेल्या सहा वर्षांपासून कुणालच शेरूचा सांभाळ करीत होता. शनिवारी शेरूला बिस्किटे भरविताना नातवाच्या आठवणीने आजोबा बबनराव गाभुड यांचे डोळे पाणावले.
‘कुणालने डॉक्टर व्हावे, अशी त्याची आणि आई-वडिलांची इच्छा होती. तो शांत आणि हुशार मुलगा होता. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार नसावा,’ असे बबनराव यांनी सांगितले. कुणालच्या आठवणींसोबत शेरूचाही सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सोशल मीडिया पोस्ट; कौटुंबिक वादाचे संकेत
चांदगुडे कुटुंब चार महिन्यांपूर्वी देवळाई परिसरातून झाल्टा फाटा परिसरात राहण्यासाठी आले होते. २ महिन्यांपासून कुटुंबात कुरबुर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संगीता यांनी ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर संपत्ती, शेती, मुलगा आणि काही नातेवाईकांना उद्देशून रीलच्या स्वरूपातील व्हीडीओ पोस्ट केले.
यातून नातेसंबंधांतील तणाव, कौटुंबिक वादांचे संकेत मिळत असल्याने पोलिसांकडून त्यांचीही तपासणी होत आहे. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर संगीता यांचा कुणालवर अधिक जीव होता. त्यांनी कुणालसोबतचे व्हीडीओ, पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले होते.
केवळ मोबाईल हे कारण नसावे
कुणालने टोकाचा निर्णय घेण्यामागे केवळ मोबाईल हेच कारण होते, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यामागे अनेक कारणे असण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवून प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले.
















