विशाखापट्टणम : पश्चिम आशियातील तणावामुळे भारतातील नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील नागरिक गॅस टंचाईचा सामना करत असताना डिलिव्हरी बॉयने तब्बल ३० सिलिंडरवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशाखापट्टणम येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाय. अप्पा राव असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.
शनिवारी गाजुवाका पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, ही घटना चिनागंत्याडा येथील ‘मणिकांता गॅस एजन्सी’मध्ये घडली. सर्कल इन्स्पेक्टर अलहरी पार्थसारथी यांच्या माहितीनुसार, वाय. अप्पा राव नावाचा व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून या एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ग्राहकांचा विश्वास संपादन करून अप्पा राव याने गॅस सिलिंडर पोहोचवण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ‘ओटीपी’ गोळा केले. मात्र, ओटीपी प्राप्त होऊनही, त्याने अनेक ग्राहकांना भरलेले सिलिंडर पोहोचवले नाहीत.
ओटीपी शेअर करूनही ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळाले नाहीत. त्यामुळे संशय आलेल्या ग्राहकांनी चौकशी करण्यासाठी गॅस एजन्सीशी संपर्क साधला. एजन्सीच्या कर्मचा-यांनी त्यांच्या नोंदीनुसार सिलिंडरची डिलिव्हरी यापूर्वीच करण्यात आली असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकून ग्राहक हादरून गेले. दरम्यान, अप्पा राव बेपत्ता झाला आणि त्याचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच, एजन्सी व्यवस्थापनाने गाजुवाका पोलिसांशी संपर्क साधून रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अप्पा राव तब्बल ३० सिलिंडर घेऊन पळून गेला.

