परभणी : शासकीय कार्यालयांतील स्वच्छता आणि कार्यालयीन शिस्तीबाबत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी कठोर भूमिका घेतली आहे. परभणी जिल्ह्याच्या दौ-यादरम्यान शुक्रवारी त्यांनी विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली असता सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आढळली. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त रुजविण्यासाठी जी. श्रीकांत यांनी १७ सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्वत: विभागीय आयुक्त दर सोमवारी छत्रपती संभाजीनगर मुख्यालयात एक तास देऊन स्वच्छतेसाठी आग्रही असतात. कार्यालयप्रमुखांनी स्वत: पुढाकार घेऊन या उपक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. कार्यालयाच्या आवारापासून अंतर्गत कार्यालयात स्वच्छता असणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांना कुलूप न लावता ती नागरिकांसाठी खुली ठेवणे आणि त्यांची स्वच्छता सुनिश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या नियमांचे पालन होते की नाही पाहण्यासाठी कार्यालयांना आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. अस्वच्छता आढळल्यास संबंधित कार्यालयप्रमुखांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी देखील अस्वच्छतेच्या संदर्भात प्रशासनाला लक्षात आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी मदत करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
















