इराण, यूएई, सौदी अरेबिया एकाच व्यासपीठावर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत जागतिक राजकारण, दहशतवाद, पश्चिम आशियातील संकट, व्यापार, डॉलरला पर्याय आणि ग्लोबल साऊथची भूमिका या मुद्यावर चर्चा झाली. या ब्रिक्स परिषदेदरम्यान समारोपापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे १५ द्विपक्षीय बैठका घेतल्या. भारताच्या अध्यक्षतेखाली या बैठका पार पडल्या. त्यामुळे भारताचे हे मोठे यश मानले जात आहे. विशेष म्हणजे या ब्रिक्स परिषदेत इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यासारखे परस्परविरोधी भूमिका असलेले देशदेखील एका व्यासपीठावर आले. तसेच रशिया-युक्रेन युद्धावर शांततेच्या प्रयत्नांनाही या व्यासपीठावरून महत्त्व मिळाले. त्यामुळे ब्रिक्स परिषद यशस्वी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या ब्रिक्स परिषदेत भारत-चीन संबंध, दहशतवाद, व्यापार आणि जागतिक संस्थांमधील सुधारणांपासून एआय आणि डिजिटल शेतीपर्यंत विविध मुद्दे चर्चेला आले. एवढेच नव्हे तर ब्रिक्स देशांचे जगात सक्षम सामूहिक नेतृत्व तयार झाले पाहिजे, अशीही भूमिका मांडली गेली. त्यामुळे ब्रिक्स परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताने चौथ्यांदा ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भूषविले. यावेळी ब्रिक्सचे नेतृत्व करणे भारतासाठी आव्हानात्मक होते. कारण इराण, यूएई आणि सौदी अरेबिया यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही देशांना एकत्रित आणण्याचे आव्हान होते. परंतु तिन्ही देशांच्या प्रतिनिधींना एकत्रित आणण्यात भारताला यश आले. त्यामुळे भारताचे हे मोठे यश मानले जात आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या हिंसाचाराबद्दल ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. संघर्षाऐवजी संयम, संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. तेच इराण ब्रिक्सचा सदस्य असल्याने पश्चिम आशियातील संघर्षाचा थेट परिणाम संघटनेच्या भूमिकेवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भारताने संबंधित देशांच्या नेत्यांशी चर्चा करून शांततेचे आवाहन केल्याचे सांगितले जाते.
दहशतवादाविरोधात कठोर संदेश
दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले. दहशतवादी संघटनांना मिळणारा निधी आणि सुरक्षित आश्रयस्थानांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा ब्रिक्सच्या व्यासपीठावर मांडला. घोषणापत्रात या हल्ल्याचा निषेध करण्यात आल्याने दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेला महत्त्व मिळाले.
भारत-चीन संबंधाला
मिळणार झळाळी
भारत-चीन संबंधांत दुरावा निर्माण झाला होता. मात्र, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारत दौ-यावर येऊन या परिषदेत सहभागी झाले. तत्पूर्वी शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने करार झाले. त्यामुळे दोन्ही देशांचे संंबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे.
















