जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील तिरुका येथे एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर २४ तासांमध्ये आईनेही आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . जळकोट तालुक्यातील तिरुका येथील लघुउद्योजक गोविंद शिवाजी कराड (वय-५०) हे काही कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. दि ३० मार्च रोजी हृदयविकाराने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात मध्ये दि ३१ मार्च रोजी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मुलाची निधनाची माहिती त्यांची आई श्रीमती चैत्राबाई शिवाजी कराड यांना समजली. त्यामुळे त्या अकांत दु:खात बुडाल्या, अगोदरच त्या आजारी होत्या ,
मुलाचे अकाली जाणे हे दु:ख त्यांना सहन झाले नाही आणि आपल्या मुलाच्या निधनाच्या विरहाने श्रीमती चैत्राबाई शिवाजी कराड ( वय- ७० ) यांचे दि १ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या दुस-या एका मुलाचे कोरोना काळात निधन झाले होते . श्रीमती चैत्राबाईवर शोकाकुल वातावरणामध्ये तिरुका येथे दि २ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मुलाचा अगोदरच कोरोना काळात मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्या खचल्या होत्या आणि आता दुस-या मुलाचेही हृदयविकाराने निधन झाले त्यामुळे त्यांना अधिक धक्का बसला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुलगा आणि आईचा २४ तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याने संपूर्ण तिरुका गावावर शोककळा पसरली आहे.

