38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeनांदेडमोठा नेता रूसल्यास विमान, छोट्यासाठी हो बेईमान

मोठा नेता रूसल्यास विमान, छोट्यासाठी हो बेईमान

नांदेड : विशेष प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर नवनवीन क्लृप्त्या भाजपमध्ये वापरत आहेत. खा.चव्हाण नेहमीच हाय-फाय फंडा वापरतात, याची जाण नांदेडकरांना पूर्णपणे आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील नंबर-१ चे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील महायुतीचे ४८ उमेदवार निवडून यावेत यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करीत असली तरी नांदेडात मात्र नवनवीन फंडे भाजप वापरत असल्याचे पहावयास मिळत आहे. दुस-यांदा भाजपामध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर त्यांच्या स्रुषेला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाले होते. त्यामुळे खा.चव्हाण – खा.चिखलीकरांनी त्यांचा रुसवा काढण्यासाठी विशेष विमान वापरत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. याचीच चर्चा शुक्रवारी जोरदार झाली असली तरी याबाबत जुन्या व नवीन कार्यकर्त्यांत चर्चेला उधाण आले की, मोठा नेता रुसला की विमान आणि छोटा रुसला की हो बेईमान!

लोकसभा निवडणुकीचे वारे नांदेडमध्ये जोरदार वाहत आहे. भारतीय जनता पार्टीने प्रचार आणि प्रसाराची सुरुवात धुमधडाक्यात शुक्रवारी केली आहे. मध्यवर्ती कार्यालयदेखील स्थापन करण्यात आले. तर दुसरीकडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आ.वसंतराव चव्हाण यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यानंतर नायगावात मोठा जल्लोष करण्यात आला. नांदेड शहरात मात्र त्यांचा उत्साह फारसा काही दिसून आला नाही.

त्यामुळे एकतर्फी निवडणूक होते की काय, अशी साशंकता व्यक्त होत असतानाच गुरुवारी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांचा रुसवा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा व विधानपरिषदेचे माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी खूप प्रयत्न केले. परंतु दादा काही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे खा.चव्हाण व खा.चिखलीकरांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला फक्त आजच वेळ आहे आपण तात्काळ या. अशी संमती मिळताच विशेष विमानाची सोय करण्यात आली आणि मुंबईत त्यांची भेट घेतल्यानंतर दादांचा रुसवा दूर झाला असला तरी ही चर्चा उपरोधितपणे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चिली जात आहे.

एखादा जुना कार्यकर्ता अथवा नवीन कार्यकर्ता रुसला तर तुझ्या रुसण्याने मतदारावर फारसा काही फरक पडत नाही. त्यामुळे तू रुसला काय अन् बेईमान झाला काय, याचे आम्हाला देणे-घेणे नाही, अशा अविर्भावात भाजपचे नेते वागत असल्याचे एका जुन्या कार्यकर्त्याने एकमतशी बोलताना मत व्यक्त केले. त्यामुळे हा फंडा भाजपला कितपत फायद्याचा राहील, हे येणारा काळच ठरवेल. एकंदरीत विशेष विमान दौरा मात्र चांगलाच चर्चिला गेला. आता यामुळे पक्षातील अनेक नवे-जुने कार्यकर्ते रुसले तर उमेदवाराला महागात पडणार आहे. केवळ ४५ दिवस तरी सर्वांना मानसन्मान द्यावाच लागणार आहे. याची कल्पना उमेदवाराला पूर्णपणे असल्यामुळे उमेदवाराने ती तयारीदेखील केली असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR