किनवट : प्रतिनिधी
रात्रीच्या गस्तीदरम्यान वनविभागाच्या पथकाला चकवा देऊन पळून जाणा-या आणि थेट वन कर्मचा-यांच्या वाहनाला धडक देणा-या सागवान लाकूड तस्करांच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुरुवातीला तीन दिवसांची वन कोठडी आणि त्यानंतर आरोपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गस्त घालत असलेल्या वनविभागाच्या पथकाला सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. वन पथकाने संशयित वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तस्करांनी पथकाला चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि थेट वनविभागाच्याच वाहनाला धडक दिली. याप्रकरणी वनविभागाने तत्परतेने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांन्वये वन गुन्हा क्र. ०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला.
सुरुवातीलाआरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली होती. वन कोठडीची मुदत संपल्यानंतर वनविभागाने तपास पूर्ण करून आरोपी शेख कासीम शेख उस्मान, शेख जावेद शेख रफिक आणि शेख सोहेल शेख शौकत यांना, ८ ऑगस्ट रोजी किनवट न्यायालयात पुन्हा हजर केले.असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एम. मानकर यांनी तीनही आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांचे धाबे दणाणले असून पुढील तपास वनविभाग करत आहे.
















