शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामाची सुरुवात समाधानकारक पावसाने झाली होती. पहिल्या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतक-यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिकांची पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात उन्हाचा तडाखा आणि जोरदार वा-यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून कोवळी पिके पावसाच्या प्रतीक्षेत करपू लागली आहेत. त्यामुळे शेतक-यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
यंदा तालुक्यात खरीप पिकांसाठी सुमारे २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून अद्याप केवळ ४४ टक्के पेरणी झाली आहे. पुरेशा पावसाअभावी उर्वरित क्षेत्रातील पेरणी रखडली आहे. अनेक शेतक-यांनी पाऊस पडेल या आशेवर शेताची मशागत करून ठेवली असली तरी पावसाअभावी पेरणी करता आलेली नाही. ज्या शेतक-यांनी सुरुवातीच्या पावसावर पेरणी केली, त्या शेतांमध्ये उगवण झाली असली तरी सततचे ऊन आणि वारा यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली असून जमिनीतील ओलावा संपत चालल्याने पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. लवकरच पाऊस न झाल्यास अनेक शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करूनही पावसाने साथ न दिल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत आहेत. दुबार पेरणी करावी लागल्यास खर्चात मोठी वाढ होणार असून आधीच वाढलेल्या शेतीखर्चामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. तालुक्यातील विहिरी, शेततळी आणि लहान जलस्रोतांमधील पाणीसाठाही अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसल्याने पिकांना संरक्षणात्मक पाणी देणे अनेक शेतक-यांना शक्य होत नाही. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम सध्या पावसावरच अवलंबून आहे.
















