शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
दुष्काळामुळे शेती उद्ध्वस्त झाली, शेतक-यांच्या हाताला काम राहिले नाही आणि शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात गरजूंच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यासाठी संदीप नाईक प्रतिष्ठान (नवी मुंबई) यांच्या वतीने ‘मायेचा हात’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
याअंतर्गत आनंदवाडी येथील ६० दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना, तर आरीमोड येथील मसनजोगी वस्तीवरील ३० मजूर कुटुंबांना दिवाळी फराळ व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यंदा पावसाने दडी मारल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात मजुरांच्या हाताला काम नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार हे किट वाटप करण्यात आले. यासाठी भाजप सरचिटणीस गणेश खरटमोल यांनी या मदतीच्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
आनंदवाडी येथे ६० शेतकरी कुटुंबांना तर आरीमोड येथील मसनजोगी वस्तीत ३० गरजू मजूर कुटुंबांना गोडतेल, विविध डाळी, अन्य जीवनावश्यक अन्नधान्य आणि दिवाळी फराळाचे किट देण्यात आले. विशेष म्हणजे, समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा शेळके, भाजप सरचिटणीस गणेश खरटमोल, माजी सरपंच नागनाथ चलमले, सरपंच भागवत वंगे, हनुमंत परले, सुदर्शन धुळे, नारायण पवार, प्रल्हाद वेंजणे, माधव परले, विठ्ठल नाटकरे, अंकुश बोडके यांच्यासह परिसरातील तरुण, शेतकरी व मजूर उपस्थित होते.
















