लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ‘एमआरआय’ मशिन गेल्या अनेक वर्षांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होती. ‘एमआरआय’ मशिन सुरू करावी, म्हणुन स्थानिक पातळीवर विविध संघटनांनी आंदोलने केली. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील ‘एमआरआय’मशीनचा विषय विधान सभेच्या अधिवेशनापर्यंत पोहोचला होता. परिणामी हा विषय ऐरणीवर आल्याने गेल्या १५ दिवसांपुर्वी रुग्णालयाला ‘एमआरआय’ आली आणि त्याच्या फाऊंडेशनचे काम पुर्ण होऊन दि. २५ जुलै रोजी ‘एमआरआय’ मशीन सुरू झाली आहे. त्यामुळे आता रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन चालू करावी, अशी मागणी शिव आरोग्य सेना लातूर जिल्हा समन्वयक तथा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते यांच्याकडे सतत लावुन धरली होेती. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते व रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. बालाजी कोंबडे यांनी प्रशासकीय पाठपुरावा करुन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी नवीन ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध करून ती सुरू केली.
त्याबद्दल अधिष्ठाता डॉ.उदय मोहीते यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्र्यंबक स्वामी, भास्कर माने, शंकर रांजणकर, मारुती सावंत, तानाजी ऐतनबोणे, महाराष्ट्र अटोरिक्षा चालक सेनेचे लातूर जिल्हा सचिव बंडुसिंग भाट, परवाना धारक रिक्षा संघटनेचे मच्छिंद्र कांबळे, सुरेश शिंदे, व अॅड. विठ्ठल भोसले, तसेच विशाल माने, बसवराज स्वामी घरणीकर, शिवशंकर स्वामी, अनिल स्वामी, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.
आमदार अमित देशमुख यांनी अधिवेशनात मांडला होता विषय
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून ‘एमआरआय’ मशीन नसल्याने सामान्य नागरिकांना खाजगी ठिकाणी ‘एमआरआय’ काढण्याकरीता जावे लागते. यात रुग्णांवर आर्थिकभार पडतो. त्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी नवीन ‘एमआरआय’मशीन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी विधान सभेच्या अधिवेशनात मांडला होता. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी लवकरच ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. ते आज पूर्ण झाले.
















