लातूर : प्रतिनिधी
आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर शहरात सोमवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं असून आरक्षण उपवर्गीकरण राज्य सरकारने तात्काळ करावे या मागणीसाठी या महामोर्चाचे काढण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. माधव गादेकर, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या महामोर्चात राज्यभरातून कार्यकर्ते लातुरात धडकणार आहेत. यासाठी गेल्या महिन्याभरापासून मातंग समाजाच्या वतीने जिल्हाभरात बैठका घेतल्या आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक येथून महामोर्चास सुरुवात होणार आहे. गंजगोलाई, मेन रोड, महात्मा गांधी चौक, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे महामोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या पत्रकार परिषदेस राज क्षीरसागर, अशोक देडे, मोहन सुरवसे, रसाळ आदी उपस्थित होते.
















