लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी, अशी उल्लेखनीय कामगिरी करीत व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसी, लातूर या संस्थेने राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. संस्थेला भारतीय गुणवत्त परिषद( एनएबीईटी) यांच्या राष्ट्रीय मूल्यांकन प्रक्रियेत देशात ३१ वा क्रमांक प्राप्त झाला असून क्युसीआय-एनएबीईटी म्हणजेच भारतीय गुणवत्ता परिषद अंतर्गत कार्यरत नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्याकडून प्रतिष्ठेचे ‘अ’ वर्ग मानांकन बहाल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे मानांकन प्राप्त करणारी लातूरची व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसी मराठवाडा विभागातील ही पहिली फार्मसी संस्था ठरली आहे.
संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, आधुनिक पायाभूत सुविधा, प्रभावी प्रशासन, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणारे वातावरण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणा-या उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसीने देशातील गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देणा-या अग्रगण्य संस्थांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या यशामागे संस्थेच्या दूरदृष्टी असलेल्या व्यवस्थापनाचे सक्षम नेतृत्व, प्राचार्यांचे प्रभावी मार्गदर्शन, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची निष्ठा, विद्यार्थ्यांची मेहनत, माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य तसेच सर्व हितचिंतकाचे सातत्यपूर्ण योगदान असल्याची भावना संस्थेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या व्यवस्थापनाने या यशाचे संपूर्ण श्रेय विलासराव देशमुख फाउंडेशन परिवाराला देत सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. भविष्यातही गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम, उद्योग- संलग्न शिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा निर्धार व्हिडीएफकडून व्यक्त करण्यात आला आहे. व्हीडीएफ स्कूल ऑफ फार्मसीच्या या ऐतिहासिक यशामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक उंचावला असून विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांकडून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















