लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात यंदा अपु-या पावसामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, राज्य सरकारने पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि टंचाई निवारणासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा प्रशासनाकडून होते आहे. ग्रामीण भागात जलस्त्रोतांचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, धरणांमधील आणि इतर जलस्त्रोतांतील पाणीसाठा व भूजल पातळी झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे आडातच नाही तर पोह-यात कोठून येणार?, अशी लातूर जिल्ह्यात परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील ९२६ बाधित गावांपैकी २७१ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ३८५ अधिग्रहणाद्वारे पाणीपूरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आणखी ३६४ गावांतील ५६७ प्रस्ताव मंजूरीच्या प्रतीक्षेत आहेत. हिवाळ्यात अशी परिस्थिीती आहे. उन्हाळ्यात तर स्थिती भयंकर असेल. ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे सावट कसे दुर करता येईल, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील २२२ गावे आणि ४९ वाड्या हल्ली प्रचंड तहानलेल्या आहेत. जिल्ह्यात वाडी, तांडे, वस्त्या, गावे ११०० पेक्षा जास्त आहेत. या सर्वच गावांत भविष्यात पाणी टंचाई उद्भवेल, अशी परिस्थिती आहे.
















