चाकूर : प्रतिनिधी
या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून काहीही न बोलता परत जाण्याचे ठरवले होते मात्र शेतक-यांच्या व्यथा ऐकल्यानंतर बोलावेसे वाटले. संकटाच्या काळात शेतक-यांच्या दारापर्यंत पोहोचणे हे माझे कर्तव्य आहे. शासनाकडून नुकसानभरपाई, कर्जमाफी, रोजगाराच्या योजना आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पासारख्या दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा केले.
महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आनंदवाडी, नायगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतक-यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. दुष्काळी परिस्थिती मुळे पिकांचे नुकसान, जनावरांच्या चा-याची टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्याचे काम केले. अॅड. श्रीनाथ सावंत यांनी राज्यपाल महेदयाना भगवतगीता देऊन नायगावचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले. तसेच यावेळी गाव शिवारातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. या दुष्काळी पाहणी दौ-यात पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी भारत बास्तेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















