लातूर : योगीराज पिसाळ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा विभाग स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजी नगर येथे पार पडला. यात लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीने मराठवाडयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवरांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब वाघ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जावेद शेख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहन अभंगे, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत निवडलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचा सत्कार सोहळा विभाग स्तरावर पार पडला. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजी नगर विभागातील ग्रामपंचायतीनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग घेतला होता. विभागस्तरीय समितीने प्रत्येक जिल्हयातून २ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या गुणांकनाची तपासणी झाली होती. यात लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीने मराठवाडयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आनंदवाडी ग्रामपंचायतीला ८० रूपयांचे बक्षीस व पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
उटी बुदु्रक ग्रामपंचायत राज्य स्तरावर तृतीय
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील उटी बुदु्रक ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर तृतीय क्रमांकावर ठसा उमटवत १ कोटी रूपयांचे बक्षीस व पुरस्कार मिळवला होता. त्याच बरोबर छत्रपती संभाजी नगर येथे विभाग स्तरावर निलंगा तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायतीने मराठवाडयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या ग्रामपंचायती इतर ग्रामपंचायतींना विकासात्मक दृष्टीने आदर्श घेण्यासारख्या आहेत.
लातूर जि. प., १० पं. स.च्या पुरस्कारांची घोषणाच नाही
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ग्रामपंचायतीच्या गुणांकणानुसार राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींची पुरस्कारासाठी निवड होऊन त्यांचा नुकताच दि. ११ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव झाला होता. मात्र छत्रपती संभाजी नगरच्या विभाग स्तरीय पुरस्कारात मराठवाडयातील एकाही जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची पुरस्कारासाठी शासनाने निवड केली नाही की झाली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ग्रामपंचायतींचे जिल्हा स्तरावरचे व तालुका स्तरावरचे पुरस्कार वितरण केंव्हा होणार याकडे सर्व ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.
















