मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली धक्कादायक माहिती
मुंबई : प्रतिनिधी
सोलापूर आणि चंद्रपूरमध्ये खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतक-यांनी कम्बोडिया आणि तामिळनाडूत जाऊन किडन्या विकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत एका प्रश्नामुळे पुढे आली. या प्रश्नाला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतक-याने खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे कम्बोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना किडनी विकली व कर्ज फेडले. पोलिस तपासात यातील मध्यस्थाने स्वत:सह ९ व्यक्तींच्या किडन्या कम्बोडिया आणि तामिळनाडूतील स्टार किम्स हॉस्पिटल येथे विकल्याचे समोर आल्याची धक्कादायक माहिती दिली
या प्रकरणात सावकारी करणा-या ६ आरोपींबरोबरच किडनी खरेदी-विक्रीत सहभागी असणा-या अन्य ५ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका आरोपीला फरार घोषित केले असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नितीन राऊत, भाजपचे अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी राज्यात सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी शेतक-यांना किडनी विकावी लागत असून किडनी विक्रीचे रॅकेट तामिळनाडू येथील तिरूचिरापल्ली येथील एका हॉस्पिटलद्वारे चालविले जात आहे. या प्रकरणात आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय मानवी अवयव तस्करीचे जाळे कार्यरत असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
हा प्रश्न चर्चेला आला नाही; पण प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात धक्कादायक माहिती पुढे आली. रोशन सदाशिव कुडे या चंद्रपूर जिल्ह्यातील दुधाचा व्यापार करणा-या अल्प भूधारक शेतक-याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतक-याने कम्बोडियामध्ये जाऊन किडनी विकली. हे किडनी रॅकेट तामिळनाडू येथील तिरूचिरापल्ली (तिरूची) येथील एका हॉस्पिटलव्दारे चालवले जात असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले.
सावकारी कर्ज फेडण्यासाठी
शेतक-याने उचलले पाऊल
सोलापूरचा मध्यस्थ
तक्रारदार शेतक-याने सावकारांकडून ९ लाख १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या व्याजासह शेतक-याने आरोपींना ४८ लाख ५३ हजार रुपयांची रक्कम व एक एकर जमीन परतफेड म्हणून दिली; पण तरीही सावकारांकडून पैशांसाठी सतत तगादा सुरूच होता. यामुळे संबंधित शेतक-याने कम्बोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना किडनी विकली व ६ लाखांचे कर्ज फेडले. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास केला असता सोलापूर येथील एका मध्यस्थामार्फत कम्बोडिया येथे किडनी विकल्याचे समोर आले आहे. मध्यस्थाने स्वत:सह आणि ९ व्यक्तींच्या किडन्या कम्बोडिया तसेच तामिळनाडूतील स्टार किंम्स हॉस्पिटल येथे विकल्या असल्याचे उघड झाले. यातील पीडित ७ जण परराज्यातील आहेत.

