मुंबई : प्रतिनिधी
देशात एकीकडे अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढू लागल्याचे चित्र यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत दिसून आले. मात्र, प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा ओढा हा मुख्यत: शहरी भागापुरता मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची नावेही नोंदली गेली नाहीत. उच्च शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा तब्बल ६६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या राहिल्या आहेत. त्यापैकी १९ महाविद्यालयांत २० टक्क्यांहून कमी प्रवेश तर ४ महाविद्यालयांत १० टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
राज्यातील ३७२ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील २ लाख २ हजार ८८३ जागांसाठी एकूण १ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. म्हणजेच एकूण ८२ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. हे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. मात्र, यात शहरी भागातील विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ग्रामीण भागातील महाविद्यालये अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे ग्रामीण स्तरावर असलेले इंजिनिअरिंग कॉलेज ओस पडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कारण ५० टक्क्यांहून कमी प्रवेश झालेल्या ६६ महाविद्यालयांमध्ये एकूण १९,६७४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील फक्त ५,८७९ म्हणजेच ३० टक्के जागांवरच प्रवेश झाला. या महाविद्यालयांपैकी सर्वाधिक महाविद्यालये पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील आहेत. साता-यातील एका महाविद्यालयात केवळ तीनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे धक्कादायक चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ग्रामीण भागातील आणि नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांनाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
मुंबई विभागातही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील दुर्गम भागातील महाविद्यालयांना विद्यार्थी मिळण्यात अडचणी आल्या आहेत. नागपूर विभागातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांतील काही महाविद्यालयांनाही प्रवेश प्रक्रियेच्या अखेरपर्यंत एकही पूर्ण वर्ग तयार करता आला नाही. यावरून ग्रामीण भागातील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांना अस्तित्व टिकवणेच कठीण होऊ लागल्याचे स्पष्ट आहे.
शहरी भागात प्रवेश
तब्बल ९० टक्क्यांवर
राज्यातील १४४ शहरी महाविद्यालयांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक जागांवर प्रवेश झाल्याचे आकडे सांगतात. पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक या शहरांतील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकूण १,०६,४२० जागा होत्या. त्यातील तब्बल १,०१,६८४ जागा भरल्या. या महाविद्यालयांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्याबाहेरील विद्यार्थ्यांचाही ओढा वाढत असल्याचे संस्थांचे प्रमुख सांगतात. अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्लेसमेंट ड्राइव्ह, उद्योगसंलग्न प्रशिक्षण आणि सॉफ्ट स्किल्स कार्यक्रम यामुळे ओढा वाढला आहे.
क्षमता तब्बल २३७,
प्रवेश एकच टक्का
साता-यातील एका महाविद्यालयात २३७ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असूनही फक्त ३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे केवळ एक टक्काच जागा भरल्या गेल्या. नंदुरबारमधील एका महाविद्यालयात १३० जागा असताना १२ विद्यार्थ्यांनी, तर दुस-या ठिकाणी ७१ जागा असताना ३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अहिल्यानगरमधील ४०० प्रवेशक्षमतेच्या महाविद्यालयात केवळ ३७ विद्यार्थी तर आष्टीतील ३५० क्षमतेच्या महाविद्यालयात फक्त ३६ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला.

