29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरइतके सारे करूनही मतदानाचा टक्का घसरलाच!

इतके सारे करूनही मतदानाचा टक्का घसरलाच!

लातूर : एजाज शेख 
लातूर लोकसभेच्या निवडणुकीत महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, ७५ टक्क्यांपर्यंत मतदान व्हावे त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच विविध सण, उत्सव, जयंत्यांमध्येही जनजागृती करण्यात आली होती. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. मतदानाच्या टक्केवारीत लातूर लोकसभा मतदारसंघ किमान ‘डिस्टिंगशन’मध्ये यावा, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु, दि. ७ मे रोजी प्रत्यक्षात मतदान झाले आणि मतदानाची टक्केवारी समोर आली तेव्हा इतके सारे करूनही मतदानाचा टक्का घसरलेलाच दिसून आला. सन २०१९ च्या लातूर लोकसभा मतदारसंघात ६२.४४ टक्के मतदान झाले होते तर २०२४ च्या निवडणुकीत ६१.४४ टक्के मतदान झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत १.०३ टक्क्याने मतदान घटले. मतदान न करणारे मात्र उष्णतेची लाट, असे जुजबी कारण पुढे करून मोकळे झाले.
लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजीराव काळगे व भाजपा महायुतीचे सुधाकर शृंगारे यांच्यात मुख्य लढत झाली. दि. ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजताही मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे ६ वाजता जे मतदार मतदान केंद्रावर उपस्थित होते त्यांना मतदान केंद्रात घेऊन रात्री उशिरापर्यंत मतदान करून घेण्यात आले. लातूर लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे, या हेतूने जिल्हा निवडणूक विभागाने विविध उपक्रम राबविले. ‘स्वीप’अंतर्गत संपूर्ण मतदारसंघातील सामाजिक संघटना, महाविद्यालये, विविध सार्वजनिक ठिकाणे, क्रीडा संकुले, सार्वजनिक गं्रथालये, बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे, वॉकेथॉन, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकची ठिकाणे, शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणा-या मतदारांना तिकिट दरात सवलत, मतदान करणा-या रुग्णांना काही डॉक्टरांनीही उपचाराच्या दरात सवलत दिली होती. मतदानाचा अधिकार, सर्वांनी मतदान करा, असे वारंवार सांगितले गेले. अधिकारी, कर्मचा-यांपासून ते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही प्रचार सभांमधून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
मतदारांना आकर्षित करण्याकरिता चाकूर तालुक्यातील वडवळ येथील मतदान केंद्राबाहेर ‘वनौषधींचे महत्त्व’ या विषयावर स्टॉल लावण्यात आले होते. रेणापूर तालुक्यातील राजेवाडी मतदान केंद्र बांबू व बांबूच्या तट्ट्यांनी सजविण्यात आले होते. सखी, दिव्यांग, युवा मतदार केंद्रही होते. उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सावलीसाठी उभारण्यात आलेले मंडप, पिण्याचे थंड पाणी, प्रथमोपचार सुविधा, दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. लोकसभा मतदारसंघात यावर्षी प्रथमच इकोफ्रेंडली मतदान केंद्रांची संकल्पना राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांतर्गत लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे ‘ग्रीन लातूर’ संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याठिकाणी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळून पर्यावरणपूरक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच याठिकाणी मतदानाला येणा-या प्रत्येक मतदाराला रोपटे देऊन वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करण्यात आले होते. यासोबतच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बियांचे मतदारांना वाटप करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यात वृक्षारोपण चळवळ वाढविण्याचे, वृक्षसंवर्धनाचे आवाहन करण्यात आले. यासोबतच लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सर्व सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक महिला नियंत्रित मतदान केंद्र, दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र, युवा नियंत्रित मतदार केंद्र तयार करण्यात आले होते.
लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी भेटी दिल्या. गोदावरी लाहोटी कन्या शाळा येथील सखी मतदान केंद्रावरील सुविधांची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे आणि पोलिस अधीक्षक मुंडे यांनी पाहणी केली. तसेच तेथील मतदारांकडून या सुविधांबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथील ग्रीन लातूर मतदान केंद्राला जिल्हाधिका-यांनी भेट दिली. तसेच येथे साकारलेली संकल्पना लातूरकरांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. यावेळी त्यांच्या हस्ते मतदारांना रोपांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभागाने जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी केलेल्या प्रयत्नात तशी कमतरता कुठेच नव्हती. उष्णतेची लाट या जुजबी कारणामुळे २०१९ च्या लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा २०२४ ची मतदानाची टक्केवारी  १.०३ ने घसरल्याचे सांगितले जाते परंतु त्यामुळे  लातूर जिल्हा निवडणूक विभागाला ‘डिस्टिंगशन’ मिळवता आले नाही.
अशी झाली मतदानाच्या टक्केवारीची वाटचाल
  सकाळी ७ ते ९ या दोन तासांत ७.१९ टक्के मतदान.
  सकाळी ११ वाजेपर्यंत २०.४७ टक्के मतदान.
  दुपारी एक वाजेपर्यंत ३२.७१ टक्के मतदान.
        दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.३८ टक्के मतदान.
  सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६१.४४ टक्के मतदान.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR