31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रएमआयटी एडीटीचा ‘बेंटली सिस्टिम्स’सोबत करार

एमआयटी एडीटीचा ‘बेंटली सिस्टिम्स’सोबत करार

डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ उत्कृष्टता केंद्र सुरू

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी) आणि जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बेंटली सिस्टिम्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याचवेळी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना देणे आणि उद्योग-संलग्न शिक्षण अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड सायन्सेस अंतर्गत सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास बेंटली सिस्टिम्सचे दक्षिण आशिया विभागीय कार्यकारी कमलकन्नन तिरुवडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संचालक हर्ष नागपाल, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक मोनिका जेधे आणि परमर्थ सैनी हे मान्यवर उपस्थित होते.

एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून कार्याध्यक्ष व प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, तसेच सिव्हिल इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. युवराज भिरूड आदी उपस्थित होते.

या प्रसंगी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ तसेच बेंटली स्टुडंट क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञान आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना ६५ हून अधिक उद्योगमान्य सॉफ्टवेअर, जागतिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि विशेष तांत्रिक प्रशिक्षण सुविधांचा लाभ मिळणार आहे.

प्रमुख पाहुणे कमलकन्नन तिरुवडी यांनी आपल्या भाषणात स्मार्ट शहरीकरणासाठी सॉफ्टवेअर-आधारित बुद्धिमान पायाभूत सुविधांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.

कार्याध्यक्ष व प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील डिजिटल अभियांत्रिकी कौशल्ये प्रदान करणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR