झेडपी आणि पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांमधील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मात्र, तत्पूर्वीच काहींनी विजयाचा गुलाल उधळला. यामध्ये कोकण अग्रेसर राहिला आहे. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच महायुतीचे तब्बल २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपने १९ तर शिंदे सेनेचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषदमध्ये खारेपाटण जिल्हा परिषद उमेदवार प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषद उमेदवार सुयोगी घाडी, बापर्डे जिल्हा परिषद उमेदवार अवनी तेली, कोळपे जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद रावराणे, किंजवडे जिल्हा परिषद उमेदवार सावी लोके या भाजपकडून बिनविरोध आल्या आहेत तर, जाणवली जिल्हा परिषदेत रुहिता तांबे या शिंदेंच्या शिवसेना उमेदवारही बिनविरोध निवडून आल्या. रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडमधून शिंदे शिवसेनेला शुभ संकेत मिळाला आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. यासोबतच पंचायत समितीमध्येही बरेच उमेदवार बिनविरोध निवडून आले.
आता थेट लढत
राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींची निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेकडो इच्छुकांनी अर्ज मागे घेतल्याने ब-याच ठिकाणी आता थेट सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये लढती रंगणार आहेत. स्थानिक पातळीवर सोयीने महायुतीत आणि महाविकास आघाडीत समेट झालेली आहे तर काही ठिकाणी स्वतंत्र लढती होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चुरस वाढली आहे.

