31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeमहाराष्ट्रखरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय : सुप्रिया सुळेंचा संताप...

खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय : सुप्रिया सुळेंचा संताप…

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांचे पडसाद आता दिल्लीपर्यंत उमटले आहेत. खरातचे अनेक बड्या राजकारण्यांसोबतचे फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हीडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली असून, खरातसारख्या प्रवृत्तींमुळे आम्हाला मान खाली घालावी लागतेय, असे म्हटले आहे.

नाशिकच्या अशोक खरात या भोंदूबाबाची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. स्वत:ला आध्यात्मिक शक्ती असलेला बाबा म्हणवून घेणा-या खरातने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये केल्याचे काही व्हीडीओंमधून समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे व्हीडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते खरातच्या पाया पडताना किंवा त्याच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

सुप्रिया सुळेंनी सांगितली दिल्लीतील व्यथा
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणामुळे दिल्लीत मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपली खंत व्यक्त करताना म्हटले की, खरात प्रकरण हे माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा खूप मोठा धक्का आहे.

खूप दुर्दैवी, अस्वस्थ करणारे
देशात या खरातने महाराष्ट्राची चेष्टा करून ठेवली आहे. दिल्लीत काम करत असताना बाकीच्या राज्यांमधील लोक, खासदार सातत्याने मला भेटत असतात. ते चेष्टा करायला लागलेत की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय म्हणून. ज्या प्रकारे लोकांचे व्हीडीओ येत आहेत हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे आहे. आपण सगळ्यांनीच याचे आत्मचिंतन केले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR