औसा : प्रतिनिधी
तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने सोमवारी औसा येथे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. विविध विभागांशी संबंधित शेकडो तक्रारींची सुनावणी करून अनेक प्रकरणांचा संबंधित विभागांच्या अधिका-यांसमोर जागेवरच निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
जनता दरबारासाठी औसा तालुक्यातील विविध गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. रस्ते, महावितरण, महसूल, अतिक्रमण, पाणीपुरवठा, ग्रामविकास, सामाजिक न्याय आदी विभागांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. अनेक तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आला तर उर्वरित प्रकरणे निश्चीत कालमर्यादेत निकाली काढून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रशासनाने सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे, नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी अधिकारी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यावर भर देतानाच नागरिकांनी अनावश्यक सामाजिक खर्च टाळून गावातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अभिमन्यू पवार यांनी विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. शासकीय रस्ते किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांकडून नियमानुसार नुकसानभरपाईची वसुली करण्यात यावी, तसेच विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करीत अधिका-यांना वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, औशाचे प्रभारी नगराध्यक्ष अफसर शेख भाजपचे संतोष मुक्ता, सुभाष जाधव, शिवसेनेचे नगरसेवक पियुष म्हेत्रे ,बंडू कोद्रे, संतोष सोमवंशी यांच्यासह जनता दरबारास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
















