चाकुर : प्रतिनिधी
चाकूर पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. हा अविश्वास प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला आहे. चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे हे पंचायत समिती सभापती जयश्री नागरगोजे, उपसभापती भुजंग शिंदे आणि पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत. मागच्या मासिक बैठकीत घरकुल व इतर कामासंदर्भात अहवाल सादर करण्यात सांगितला होता मात्र तोही अद्याप सादर केला गेला नाही. अशा अनेक कारणांत गटविकास अधिकारी हे कसूर करत आहेत. यामुळे पंचायत समिती सदस्य संतोष कलवले यांनी गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांच्यावर अविश्वास ठराव मांडला. या ठरावाला उपसभापती भुजंग शिंदे यांनी अनुमोदन दिले व सर्व सदस्यांनी हात उंचावून एकमताने गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांच्या वरचा अविश्वास ठराव मंजूर केला. आणि हा ठराव पुढील कार्यवाही साठी वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सभापती जयश्री नागरगोजे यांनी सांगितले आहे.
या सभेत सभापती जयश्री नागरगोजे, उपसभापती भुजंग शिंदे, पंचायत समिती सदस्य सावित्रीबाई केदार, मनिषा जाधव, गजानन होनराव, सुप्रिया हाके, संतोष कलवले, मिरावती कसबे यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने हात उंचावून ठराव मंजूर केला. दरम्यान पंचायत समितीच्या मासीक बैठकीत घेण्यात आलेला ठराव चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी सांगितले आहे















