निलंगा : प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत तीव्र विरोधाची भूमिका मांडण्यात आली. तसेच ६ जुलै रोजी लातूर येथे होणारा जिल्हास्तरीय महामोर्चा मोठ्या संख्येने यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीत विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींनी अनुसूचित जातींच्या घटनात्मक अधिकारांवर कोणत्याही प्रकारची गदा स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या एकात्मतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत, संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या तत्त्वांना धक्का पोहोचू नये, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाजघटकांशी व्यापक चर्चा करून निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी करण्यात आली. शासनाने समाजात मतभेद निर्माण करणा-या निर्णयांऐवजी विश्वास, संवाद आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारी भूमिका स्वीकारावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
बैठकीत निलंगा शहर व तालुक्यातील प्रत्येक गावातून महिला, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी लातूरच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक भागातून वाहनांची व्यवस्था करून हजारो नागरिकांच्या सहभागासाठी नियोजन आखण्यात आले. बैठकीस विलास सूर्यवंशी, अंकुश ढेरे, प्रा. रोहित बनसोडे, दाजीबा कांबळे, अर्जुनाप्पा कटके , काशिनाथ जाधव , शरद पेठकर , धम्मानंद काळे, प्रकाश गायकवाड, प्रकाश कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, देवदत्त सूर्यवंशी, अनंत कांबळे, बंटी कांबळे, शुभम सूर्यवंशी, राहूल मोरे, गजानन सूर्यवंशी, सलीम पठाण, मोहन सूर्यवंशी यांच्यासह विविध समाजघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















