परभणी : परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाईसाठी जिंतूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १२ जून रोजी रात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिंतूर शहर व परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस स्टेशन जिंतूर येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी अभिजीत उर्फ बिल्ली सुभाष राठोड (वय ३०, रा. गणपती गल्ली, जिंतूर) हा त्याच्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ गणपती गल्ली परिसरात कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये यांच्यासह पोलीस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पोळ, सूर्यकांत फड, विलास सातपुते, मुकेश बुधवंत, पांडुरंग तूपसुंदर, चालक शहाणे यांनी सहभाग घेतला.
















