छ. संभाजीनगरमध्ये ५ कंपन्या बंद!, लघु उद्योगांनाही टाळे?
मुंबई/छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
इराणवर युद्ध लादल्याने इंधन आणि व्यापार ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. इराणने अनेक अरब देशातील रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट केल्याने आणि होर्मुझ स्ट्रेट या समुद्र मार्गावर अडचणी उभ्या केल्याने जगावर इंधनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतातही गॅस पुरवठा बाधित झाला असून, घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. तसेच व्यावसायिक गॅस वापरावरही मर्यादा आली आहे. आता राज्यातील या गॅस टंचाईचा सामना उद्योगधंद्यांना करावा लागत आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगरमधील ५ मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच बरेच लघुउद्योगही ठप्प आहेत. राज्यातही गॅस टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत.
गॅस टंचाईमुळे संभाजीनगरमधील ५ मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक उद्योग अडचणीत सापडले असून तब्बल ५ मोठे उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्या आणि स्टील उद्योगांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. उद्योगांना आवश्यक असलेला गॅस न मिळाल्याने उत्पादन प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास उद्या मोठ्या प्रमाणात उद्योग बंद होतील. ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपनीला मोठा फटका बसू शकतो असे म्हणत चेंबर ऑफ मराठवाडा अँड अॅग्रीकल्चर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून गॅस पुरवठा कायम सुरू ठेवण्याची विनंती केली आहे.
संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज ,चिखलठाणा येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत गॅस वापरला जातो, स्टील कंपनीला देखील मोठा गॅस लागतो. मात्र, गेल्या काही दिवसांत गॅसचा पुरवठा घटल्याने काही युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी सरकारने मदत करावी. मोठ्या उद्योजकांना फटका बसल्यास छोटे उद्योगही पूर्ण बंद पडतील, कृषी आणि इतर युनिटही बंद पडू शकतात. आजची परिस्थिती गंभीर आहे. उद्या तर आणखी गंभीर परिणाम जाणवतील, बजाज ऑटोला पुरवठा करणा-या युनिटला फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये
उद्योगांना गॅस पुरवठा बंद
सध्या उद्योगांचा गॅस पुरवठा ठप्प आहे. अशीच गॅस टंचाई कायम राहिली तर उद्या आणखी काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाजीनगर औद्योगिक क्षेत्राला रोज सुमारे २५० ते ३०० मेट्रिक टन गॅसची गरज असते. मात्र, सध्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने उद्योगांवर मोठे संकट ओढवले आहे.
४० ते ५० लघुउद्योगही बंद
गॅसचा तुटवडा झाल्याने संभाजीनगरमधील ४० ते ५० लघुउद्योग बंद करण्यात आले असून पावडर कोटिंग, फोर्जिंग, केमिकल यासह इतर लघुउद्योग बंद झाले आहेत. संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० लघुउद्योग आहेत, अशी माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरचे (मासिया) अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली.
सीएमआयएचे मुख्यमंत्र्यांना पत्र
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) या उद्योग संघटनेने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. तातडीने गॅस पुरवठा सुरू करून उद्योगांना मदत करावी, अशी मागणी संघटनेने केली.
गॅसचा तुटवडा, मुंबईत
२० टक्के हॉटेल्स बंद
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून मुंबईतील जवळपास २० टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आहार (असोसिएशन ऑफ हॉटेल्स अॅण्ड रेस्टॉरंटस मुंबई) संघटनेने दिली. हा तुटवडा कायम राहिल्यास येत्या ३ दिवसांत ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरात आणि राज्यातही गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबईत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून आहे. परंतु गॅस तुटवड्याचा हॉटेल उद्योगावर थेट परिणाम होत आहे.
या कंपन्यांमध्ये
होतो गॅसचा वापर
-स्टील आणि इंजिनिअरिंग उद्योग
-ऑटो कॉम्पोनंटस उत्पादन
-फार्मास्युटिकल कंपन्या
-ब्रुअरीज आणि फूड प्रोसेसिंग
-सिरॅमिक्स आणि ग्लास उद्योग
-उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे बॉयलर आणि थर्मिक फ्लुइड हीटर्स

