परभणी : पालम तालुक्यातील श्री क्षेत्र फळा येथील गोदावरी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. ११ जून रोजी सायंकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साई कैलास पवार (वय १२, रा. रायवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) हा आपल्या कुटुंबासह मौजे फळा येथे देवदर्शनासाठी आला होता. दर्शनानंतर तो गोदावरी नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला.
मात्र नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसेच त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती त्याचे वडील कैलास पवार यांनी पालम पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून पालम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार कांगणे करीत आहेत.
















