38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा ७१ वा महाशिवरात्री यात्रा महोत्सव शुक्रवार, दि. ८ ते २५ मार्च या कालावधीत   होणार आहे. या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
यात्रा महोत्सवात दि.  ७ व ८ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजता गवळी समाजाचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर श्रींचा दर्शन सोहळा सुुरू होणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिका-यांच्या हस्ते श्रींची महापूजा व झेंडावंदन होणार आहे. यानंतर संत सावता माळी भजनी मंडळ व माळी बांधवांतर्फे माळी गल्ली येथून मिरवणूक काढत पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल. याच दिवशी श्रीमती सरस्वती कराड रक्त केंद्र, लातूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता गौरीशंकर मंदिरापासून पारंपारिक झेंड्याच्या काठींची मिरवणूक निघणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री ९ ते ११ या कालावधीत हभप ज्ञानोबा माऊली महाराज आष्टेकर यांचे कीर्तन तसेच पं. बाबुराव बोरगावकर व पं. रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन होणार आहे. यात्रेच्या कालावधीत शनिवार दि. ९  रोजी वीरशैव तेली लिंगायत समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरास गंगेच्या पाण्याचा अभिषेक केला जाणार आहे. रविवार दि. १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय आरोग्य स्टॉलचे उद्घाटन होणार आहे. मंगळवार दि. १२ रोजी सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत गुरुवर्य श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन होणार आहे.
शुक्रवार दि. १५ रोजी लक्ष्मण श्रीमंगले व शिवकुमार उरगुंडे यांचे संगीत भजन रात्री ८ ते ११ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दि.१६ रोजी पुणे येथील श्रुती बोरगावकर यांचे गायन होणार असून प्रकाश बोरगावकर व जनार्दन गुडे त्यांना तबला व हार्मोनियमवर साथ देणार आहेत. रविवार दि.१७ रोजी सकाळी ९ वाजता १००१ महिलांच्या वतीने श्री सिद्धेश्वरास महारुद्र अभिषेक संपन्न होईल. यानंतर महिलांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. याच दिवशी रात्री ८ ते ११ पं. विठ्ठलराव जगताप यांचे संगीत भजन होणार आहे. सोमवार दि.१८ रोजी रात्री विजयकुमार धायगुडे यांचे संगीत भजन संपन्न होईल.
यात्रा कालावधीत मंगळवार दि. १९ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वतीने पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी रात्री कृष्णा हुमनाबादे यांचे संगीत भजन होणार आहे. बुधवारी दि. २० रोजी पशु व अश्वप्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न होईल. गुरुवारी दि. २१ रोजी हरीश कुलकर्णी, शुक्रवारी दि. २२ रोजी भुजंग मुरके व शनिवार दि. २३ रोजी रात्री विक्रम कोतवाड यांचे संगीत भजन होणार आहे. दि. २४ रोजी डॉ. दत्ता राजे यांचे संगीत भजन आयोजित करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत दररोज रात्री कीर्तनांचेही आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ मार्च पासून दररोज अनुक्रमे हभप भगवान महाराज  महाळंगीकर, हभप गुरुराज महाराज देगलूरकर, हभप कृष्णा महाराज चवरे, हभप संजय महाराज खडक उंबरगेकर, हभप राजेश पाटील महाराज गुंजरगेकर, हभप महेश महाराज माकणीकर यांची कीर्तने होणार आहेत.
सोमवार दि. २५ मार्च रोजी हभप जनार्दन दास महाराज वृंदावन यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. रविवार दि. २४  मार्च रोजी सकाळी ११.३०  वाजता जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.  सोमवार दि. २५ मार्च रोजी रात्री ८  वाजता उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी न-हे- विरोळे यांच्या उपस्थितीत शोभेच्या दारुची आतिषबाजी केली जाणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांनी दिली. शहरासह जिल्ह्यातील भक्त मंडळींनी व नागरिकांनी या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR