जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील घोणसी परिसरात मंगळवारी (दि. २९ जुलै) रात्री मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही तासांत तब्बल ५५ मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली. या दमदार पावसामुळे संपूर्ण शिवार ओलाचिंब झाले असून शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यंदाच्या हंगामात जळकोट तालुक्यात पावसाने एकूणच समाधानकारक हजेरी लावली आहे. मधल्या २० ते २२ दिवसांच्या उघडीपीचा कालावधी वगळता पिकांच्या वाढीस पोषक असा पाऊस सातत्याने होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतशिवार हिरवागार झाले असून खरीप पिकांची वाढ जोमात सुरू आहे. घोणसी परिसरात झालेल्या या मुसळधार पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. आगामी काळातही अशाच स्वरूपाचा पाऊस सुरू राहिल्यास तलाव, बंधारे व इतर जलसाठ्यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे
















