Homeमहाराष्ट्र‘चप्पल’ मुळे घडला रक्तरंजित थरार

‘चप्पल’ मुळे घडला रक्तरंजित थरार

नागपुरात डोक्यात विटा घालून एकाला संपवले

नागपूर : प्रतिनिधी
येथील एका साध्या चप्पल बदलण्याच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित थरारात होऊन १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना रामटेक परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी विटा आणि काठ्यांनी हल्ला करून समीर राजू ध्रुव या तरुणाची हत्या केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण समीर राजू ध्रुव छत्तीसगड) हा रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या चौघाने परिसरातील सोना ब्रिक्स वीटभट्टीवर कामाला होता. २६ मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने काही तरुण रामटेक येथील गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर चपला काढल्या असताना, एका तरुणाने चुकून दुस-याची चप्पल घातली. या किरकोळ चुकीमुळे तरुणांमध्ये गैरसमज निर्माण झाला.

दुस-या दिवशी चप्पल बदलल्याचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. हा वाद सुरू असतानाच रविवारी रात्री तो विकोपाला गेला. आरोपींनी दारूच्या नशेत समीरशी वाद घातला आणि संतापाच्या भरात त्याच्यावर विटा आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात समीर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR