Homeमहाराष्ट्रचाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडले

चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडले

भोंदूबाबा खरातला गुरू मानणे भोवले, निष्पक्ष चौकशीची मागणी
मुंबई : प्रतिनिधी
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरातला गुरू मानणा-या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

खरात प्रकरणी आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दुरान्वयेही संबंध नाही. पोलिस तपासात या गोष्टी समोर येतीलच. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे केली आहे, असे रुपाली चाकणकरांनी म्हटले.

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अशोक खरातवर कारवाई झाली. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली. चाकणकर या अशोक खरातला गुरू मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणात चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे समोर आले होते.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधी पक्षांनी दबाव वाढवला. तसेच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आधी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.

चाकणकर यांच्या
अडचणी वाढणार
रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका होत्या. खरात प्रकरणी जे कुणी दोषी असतील, अशोक खरातशी ज्यांचे कुणाचे संबंध असतील, त्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे चाकणकर यांचीही चौकशी होऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR