पूर्णा : शहरासह तालुक्यातील चोरी, घरफोडी व लुटमारीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूर्णा पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी केले आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने चोरट्यांकडून बंद दुकाने, घरे तसेच एकाकी ठिकाणांची रेकी करून चोरी करण्याची शक्यता लक्षात घेता व्यापारी व नागरिकांनी आपल्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी केले आहे.
पूर्णा शहर व ग्रामीण भागातील व्यापारी आणि दुकानदारांनी दुकान बंद करताना दुकानात रोख रक्कम, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. दिवसभरातील रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवावी किंवा बँकेत जमा करावी. दुकानाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ दुकानाच्या शटरपुरते मर्यादित न ठेवता दुकानासमोरील रस्ता व परिसर स्पष्टपणे कव्हर होईल, अशा पद्धतीने किमान एक कॅमेरा बसवावा. त्यामुळे दुकानासमोरील संशयास्पद व्यक्ती, वाहनांची हालचाल तसेच इतर घटनांचे रेकॉर्डिंग उपलब्ध होण्यास मदत होईल.
घरात कोणी नसताना रोख रक्कम, दागिने अथवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. घरातून बाहेरगावी किंवा अन्य ठिकाणी जाताना घर बंद असल्यास विश्वासू शेजा-यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. चोरटे शक्यतो बंद घरांना लक्ष्य करीत असल्याने घराच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बाहेरगावी प्रवासाला जात असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. आखाड्यावर रोख रक्कम, दागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नयेत. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी.
अनोळखी व्यक्तीची ओळख झाल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नये. घरात एकटी महिला किंवा वयोवृद्ध व्यक्ती असल्यास त्यांना लक्ष्य करून लुटमारीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी. नागरिकांनी घेतलेली छोटीशी खबरदारीही मोठी घटना टाळण्यास उपयुक्त ठरू शकते. पोलिसांना वेळेवर माहिती मिळाल्यास संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करणे शक्य होते. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन पोलिस निरीक्षक बेंद्रे यांनी केले आहे.
















