40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरात प्रत्येक १० पैकी ४ रुग्ण सौम्य उष्माघाताचे

छ. संभाजीनगरात प्रत्येक १० पैकी ४ रुग्ण सौम्य उष्माघाताचे

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह ‘अपना दवाखाना’मध्ये दहापैकी किमान चार रुग्णांना सौम्य उष्माघाताचा त्रास झाल्याचे निदर्शनास येत आहे. उलट्या, अतिसार, ताप, मळमळ, अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी दिली जात असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

१ मेपासून सूर्य आग ओकत आहे. रविवार, दि. ५ मेपासून तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत जात आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उष्माघाताचा धोका अधिक असतो. डोक्याला, कानाला रुमाल बांधलेला नसेल, तर निश्चितच उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उष्णतेची लाट येण्यापूर्वीच मनपाच्या सर्व आरोग्य अधिका-यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. तापमानात वाढ होताच सकाळी आणि संध्याकाळी महापालिकेचे आरोग्य केंद्र, ‘अपना दवाखाना’त किंचित उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रांवर सौम्य उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर ओआरएस पाकिटांसह औषधीसाठाही देण्यात आला आहे. उन्हाचा किंचितही त्रास जाणवत असेल, तर रुग्णाने जवळच्या रुग्णालयात धाव घ्यायला हवी. वेळेवर औषधोपचार होणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी डोके आणि कान रुमालाने झाकले पाहिजेत. दिवसभरात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. सर्व आरोग्य केंद्रांवर दिवसभरात १,१०० ते १,२०० रुग्ण येत आहेत. त्यातील काही रुग्णांना अत्यंत सौम्य उष्माघात असल्याचे निदर्शनास येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR