नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वायू प्रदूषण हे जगातील अनेक देशांसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. भारतही या समस्येशी मुकाबला करत असतानाच आता भारतीयांची आणखी चिंता वाढवणारी माहीती स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून समोर आली आहे.
जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. विशेष म्हणजे आसाममधील बर्निहाट हे शहर भारतातील सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांपैकी एक ठरले आहे.
स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ मध्ये असे म्हटले आहे की, भारतातील दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायू प्रदूषित राजधानी ठरली आहे. जगातील चौथ्या क्रमाकांचे वायू प्रदूषित शहरही ठरले आहे. २०२४ मध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात वायू प्रदूषित देश बनला होता; तर २०२३ मध्ये ते तिस-या स्थानावर होता.
अहवालानुसार, जगातील सर्वात प्रदूषित १० शहरांपैकी ६ शहरे भारतात आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणाची उच्च पातळी नोंदवली जात आहे, वार्षिक सरासरी पीएम २.५ एकाग्रता प्रति घनमीटर ९१.६ मायक्रोग्राम आहे, जी २०२३ मध्ये प्रति घनमीटर ९२.७ मायक्रोग्राम होती, जी जवळजवळ बदललेली नाही. भारतात वायू प्रदूषण हा एक गंभीर धोका आहे, ज्यामुळे आयुर्मान अंदाजे ५.२ वर्षांनी कमी होते. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ अभ्यासानुसार, २००९ ते २०१९ पर्यंत, भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे १५ लाख मृत्यू झाले.
पीएम २.५ म्हणजे काय? : पीएम २.५ म्हणजे २.५ मायक्रॉन किंवा त्याहून लहान व्यासाचे अतिसूक्ष्म धूलिकण असतात. हवेत प्रदूषण निर्माण करणारे हे कण मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात कारण ते थेट फुफ्फुसांमध्ये जाऊ शकतात तसेच रक्तप्रवाहात मिसळू शकतात. यामुळे श्वसनविकार, हृदयरोग आणि अगदी कर्करोग देखील होऊ शकतात. वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि लाकूड किंवा पिकांचा कचरा जाळल्यामुळे २.५ मायक्रॉन किंवा त्याहून लहान व्यासाचे अतिसूक्ष्म धूलिकणांची निर्मिती होते.
भारतातील १३ सर्वात वायू प्रदूषित शहरे
जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित २० शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. त्यामध्ये बर्निहाट, दिल्ली, मुल्लानपूर (पंजाब), फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुडगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे. एकूणच, ३५ टक्के भारतीय शहरांमध्ये वार्षिक पीएम २.५ पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या ५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा १० पट जास्त आहे.