35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीय विशेषजागावाटपात जिंकले, निवडणुकीत जिंकतील?

जागावाटपात जिंकले, निवडणुकीत जिंकतील?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपली. महाविकास आघाडीने आपले जागावाटप महिनाभरापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे कोणता पक्ष किती आणि कुठल्या जागा लढवणार आहे हे तेव्हाच स्पष्ट झाले. महायुतीत मात्र शेवटच्या क्षणापर्यंत घोळ सुरू होता. शेवटच्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच कोण किती आणि कोणत्या जागा लढवणार आहे ते स्पष्ट झाले. कमी आमदार असूनही मुख्यमंत्रिपद दिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परतीचे दोर कापून आलेले अजित पवार यांना मूठभर जागा देऊन ३३ ते ३५ जागा लढवण्याची तयारी भाजपाने केली होती. शिंदेंच्या शिवसेनेला ८ किंवा ९ आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार-पाच जागांवर गुंडाळण्याची योजना होती. त्यासाठी कुठल्यातरी सर्वेक्षण अहवालाचे दाखले दिले जात होते. अजितदादांना बारामतीत अडकवून मूठभर जागांवर त्यांचे समाधान करण्यात भाजपाला यश आले.

पण एकनाथ शिंदे यांनी मात्र भाजपाच्या दबावाला दाद न देता शेवटपर्यंत किल्ला लढवून १५ जागा घेतल्या. मुंबई व ठाण्यातील जागांचे समसमान वाटप करायला भाग पाडले. एकनाथ शिंदे यांना भाजपाने आधी घी दिले, आता बडगा दाखवला जाईल, असे चित्र सुरुवातीला होते. पण शिंदे यांनी भाजपाला शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत अडकवून हव्या त्या जागा मिळवल्या आहेत. यामुळे भाजपा व त्यांच्यात सध्या तणाव दिसतो आहे. मुंबई व ठाण्यातील कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांचे अर्ज भरताना उपस्थित नव्हते. नेते हजर राहिले, पण त्यात औपचारिकता अधिक होती. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्ष एकमेकांच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार करतील की नाही? याबद्दल शंका व्यक्त होते आहे. मात्र या निमित्ताने शिंदे यांनी आपण कठपुतली मुख्यमंत्री नाही, हे भाजपाला दाखवून दिले. भाजपाला हे कितपत रुचले आहे व त्यांची पुढची प्रतिक्रिया काय असणार हे अर्थातच लोकसभेचे निकाल काय येतात यावर अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक जागा तर मिळवल्याच पण काँग्रेसच्या सांगली व दक्षिण मध्य मुंबईसारख्या चांगल्या जागाही हिरावून घेतल्या. शिंदेंनीही भाजपाकडून पंधरा जागा खेचून आणल्या आहेत. जागावाटपात जिंकलेल्या या दोन शिवसेना प्रत्यक्ष निवडणुकीत किती यश मिळवतात ते बघावे लागेल. दोघांच्याही पुढील वाटचालीसाठी ही बाब महत्त्वाची असणार आहे.
पहिल्या दोन टप्प्यांत विदर्भातील दहा जागांसह मराठवाड्यातील तीन जागांवर निवडणूक झाली.

भाजपाच्या दबावामुळे शिंदेंच्या शिवसेनेला भावना गवळी, हेमंत पाटील व कृपाल तुमाने या तीन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारावी लागली. तेथे नवीन उमेदवार द्यावे लागले. त्यामुळे शिंदे समर्थक आमदारांमध्ये अस्वस्थता होती. शिंदेंच्या शिवसेनेतील माजी मंत्री सुरेश नवले यांनी तर याबद्दल जाहीरपणे भाजपावर टीका केली. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चक्रव्यूहात अडकवले आहे. त्यांचा अभिमन्यू झाला असून, भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या खासदारांचे पत्ते कापले गेले, त्याचप्रमाणे विधानसभेच्यावेळी कुठल्यातरी अहवालाचे दाखले देऊन शिवसेनेच्या आमदारांना उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ही त्यांची एकट्याची भीती नव्हती. आपल्या आमदारांमधील अस्वस्थता लक्षात घेऊन पुढील काळात शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली. संभाजीनगर, नाशिक, दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवर तर भाजपाने दावा सांगितला होताच, शिवाय मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याची जागाही भाजपाला हवी होती. उदय सामंत यांचा प्रचंड आग्रह असतानाही नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिंदेंनी सोडली. पण अन्य जागा सोडायला ठाम नकार दिला. संभाजीनगरसाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड, नाशिकसाठी छगन भुजबळ, ठाण्यासाठी गणेश नाईक, दक्षिण मुंबईसाठी मंगलप्रभात लोढा व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अशी मातब्बर मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली होती.

पण शिंदे बधले नाहीत. या मातब्बर लोकांच्या तुलनेत शिंदेंनी दिलेले उमेदवार काहीसे कमजोर आहेत. मात्र त्यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. शिंदेंच्या भूमिकेमुळे नाराज झालेले भाजप नेते व कार्यकर्ते काय करणार यावर बरेच काही अवलंबून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शिंदेंच्या उमेदवारांमागे आपली सगळी ताकद लावायची, की जागा सोडली नाही म्हणून शिंदेंना धडा शिकवायचा, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. शिंदेंनाही हट्टाने घेतलेल्या जागा निवडून आणून दाखवाव्या लागतील. शिंदेंनी घेतलेल्या पंधरा जागांवर अपेक्षित यश आले नाही तर विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे निर्णय घ्यावे लागतील, अशी कुजबूज भाजपातून सुरू झाली आहे. अर्थात त्यासाठी आधी भाजपाला स्वत: लढत असलेल्या जागांवर यश मिळवून दाखवावे लागेल. शिवाय आता फेरबदल करण्यासाठी भाजपकडे फार पर्याय उपलब्ध आहेत असेही नाही. महाराष्ट्रातील प्रतिकूल राजकीय परिस्थितीला भाजप आणि फडणवीसांचे तोडफोडीचे राजकारण हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे लोकसभेचे निकाल काहीही आले तरी, सध्याच्या रचनेत फार बदल करण्याची हिंमत ते दाखवतील का? हा प्रश्नच आहे.

१३ मतदारसंघांत शिंदे विरुद्ध ठाकरे !
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २१ जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १५ जागा आल्या आहेत. या १५ पैकी १३ जागांवर त्यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी थेट लढत आहे. मुंबईतील सहापैकी तीन जागा शिंदेंची सेना लढवते आहे. या तिन्ही ठिकाणी त्यांची ठाकरेंच्या उमेदवारांशी लढत आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई व उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी थेट लढत होते आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के, तर कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत आहे. याशिवाय हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली या मतदारसंघांत ठाकरे सेना आणि शिंदे सेना समोरासमोर आहे. या १३ जागांपैकी कोणत्या शिवसेनेला अधिक जागा मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. बंडामुळे सत्ता गेली, मुख्यमंत्रिपद गेले, पक्षाचे दोन तृतीयांश आमदार, खासदार सोडून गेले. पक्षाचे नाव व चिन्हही शिंदे गटाला मिळाले. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत हाती काही लागले नाही. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेच्या न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, अशी त्यांना आशा आहे. दोन शिवसेनेतील या थेट संघर्षात जनता कोणाच्या बाजूने कौल देते याकडे सर्वांचेच लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाच मतदारसंघांत आहे. तर उस्मानाबाद आणि रायगडमध्ये ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी लढत आहेत. परभणीत शिवसेना ठाकरे व रासपचे जानकर यांच्यात लढत आहे. पण दोन शिवसेनेतील संघर्षाबद्दल सर्वाधिक कुतुहल आहे.

मोदी की गांधी?
महाराष्ट्रात विद्यमान खासदारांना फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल जनतेत असलेल्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे ही दोन उमेदवारांमधील निवडणूक नाही तर तुम्हाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी? हे ठरवा आणि त्यासाठी मतदान करा, हे भाजपाच्या प्रचाराचे मुख्य सूत्र आहे. राज्यातील १५ मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होते आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, अकोला,

या सहा मतदारसंघांत, तसेच नांदेड, लातूर, जालना, सोलापूर, पुणे, धुळे, नंदुरबार, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये मुकाबला आहे. लोक मोदी हवे की गांधी ? या प्रचाराला काय प्रतिसाद देतात हे बघावे लागेल. महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवघ्या चार जागांवर बोळवण करण्यात आली आहे. बारामती, शिरूर, रायगड व धाराशिव या चार जागा त्यांच्या वाट्याला आल्या आहेत. त्यातही शिरूरमध्ये शिवसेनेच्या आढळराव यांना, तर धाराशिवमध्ये भाजपा आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे अजित पवार गटाला खरे तर फक्त बारामती व रायगड या दोनच जागा मिळाल्या असे चित्र आहे. यातील बारामती आणि शिरूर मतदारसंघात थोरल्या व धाकट्या राष्ट्रवादीत, पवार कुटुंबात लढत होत आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे घड्याळ अजितदादांच्या गटाला दिले आहे. तर पक्षाचे मूळ मालक, संस्थापक तुतारी घेऊन लढतायत. जनता अदालत कोणाच्या बाजूने फैसला देते याचेही कुतुहल आहे.

सोमय्याचे आरोपी, महायुतीचे उमेदवार !
विख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचा एक प्रसिद्ध शेर आहे-
दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाईश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों !

हुशार राजकीय मंडळी याचे तंतोतंत पालन करतात. पण भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बहुधा तो वाचला नसावा. त्यामुळे त्यांच्यावर ‘शर्मिंदा’ होण्याची वेळ आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना किरीट सोमय्या यांनी मंत्री व सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती. पण राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत यातील बरीच मंडळी महायुतीचा भाग झाले आहेत. सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले तब्बल पाच नेते महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात सोमय्या यांनी आरोप केले होते. जरंडेश्वर कारखाना प्रकरणात नाव आलेल्या सुनेत्रा पवार बारामतीच्या उमेदवार आहेत. सिंचन घोटाळा प्रकरणी आरोप केलेले सुनील तटकरे रायगडचे उमेदवार आहेत. मुंबई महापालिकेतील घोटाळा प्रकरणी ज्यांच्यावर आरोप केले त्या यामिनी यशवंत जाधव व रवींद्र वायकर मुंबईतून निवडणूक लढवत आहेत. या लोकांचा प्रचार करणार की नाही? असा प्रश्न विचारून विरोधक सारखे त्यांना छळतायत. त्यामुळे किरीट सोमय्या सध्या मीडियापासूनही दूरच राहतात.

-अभय देशपांडे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR