27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच

राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी प्रचारसभेला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षांचा शब्द पाळला नाही म्हणून युतीतून बाहेर पडलो. याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर विरोधात नसते. कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. २०१४ ते २०१९ तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ स्वत: मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत? उद्योगधंदा आला की उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणते पक्षाचे धोरण, या शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली होती.

ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी या सभेवरून राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंना कोकणाची माहिती नाही. राज ठाकरे ज्यांच्यासाठी प्रचार करायला जातात त्यांचाच पराभव होतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. राज ठाकरे प्रचाराला गेले की, उमेदवार पडतो म्हणजे पडतो. त्यामुळे राज ठाकरेंमुळे आम्हीच सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा ंिजकणार आहोत. राज ठाकरेंनी मागच्या वेळेस लाव रे व्हिडीओ लावला होता. तेव्हा आम्हीच जिंकलो होतो, या शब्दांत वैभव नाईक यांनी निशाणा साधला.

राज ठाकरेंनी नेहमी सारखी उद्धव ठाकरेंचा द्वेष करण्यासाठी सभा घेतली. राज ठाकरेंनी जी टीका केली त्यांनी रिफायनरी संदर्भात जर थोडी माहीती घेतली असती तर ती टीका केली नसती. रिफायनरी होणार त्या परिसरात १४ हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्प आहेत, ती राज ठाकरेंनी येऊन पाहावी. राज ठाकरे ज्यांच्या बुडता जहाजाला पाठिंबा द्यायला आलात ते राणे रिफायनरीला समर्थन देणारे राणे खरे की विरोध करणारे खरे. विनायक राऊत यांचे आव्हान आहे आम्ही जर रीफायनरीच्या बाजूची एक इंच जरी जागा घेतली असेल तर ते राज ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर त्या गावात येऊन लोकांची माफी मागावी. कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीला समर्थन करणारे राज ठाकरे खरे, अशी विचारणा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR