जिंतूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला जिंतूर तालुक्यात वेग आला आहे. या प्रक्रियेंतर्गत तालुक्यातील १,०१७ विसंगती असलेले आणि १,८४५ नकाशीकरण न झालेले असे एकूण २,८६२ मतदार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मतदारांची नियमानुसार सुनावणी घेण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २० जून ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिंतूर तालुक्यातील मतदार याद्यांची तपासणी व आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील संबंधित मतदारांना सहाय्यक मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत सुनावणीच्या नोटिसा देण्यात येणार आहेत. २८, २९, ३० सप्टेंबर तसेच १ ऑक्टोबर या कालावधीत जिंतूर शहर व जिंतूर ग्रामीण भागातील मतदान केंद्रनिहाय मतदारांची सुनावणी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.जिंतूर शहर व ग्रामीण भागासाठी एकूण १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त होणारे दावे व हरकती याबाबत संबंधित मतदारांना सहाय्यक मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत नोटिस देण्यात येणार असून, त्यांचा नियमानुसार निपटारा करण्यात येणार आहे.
अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिध्द होणार
विशेष सखोल पुनरिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कळविण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या नावाची व इतर नोंदींची माहिती तपासून घ्यावी. सुनावणीची नोटीस प्राप्त झाल्यास निर्धारित दिवशी आवश्यक पुराव्यांसह संबंधित अधिका-यांंसमोर उपस्थित राहावे. दावा किंवा हरकत असल्यास निर्धारित कालावधीत ती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
जिंतूर तालुक्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार जिंतूर श्रीमती शितल कच्छवे, नायब तहसीलदार (निवडणूक) सुग्रीव मुंढे यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत आहे. मतदारांच्या सुनावण्या, दावे व हरकतींचा निपटारा, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
















