Homeसोलापूरज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी
समाजपरिवर्तन आणि समाजसेवा यांना आयुष्याचा श्वास आणि ध्यास मानलेले, समाजवादी चळवळीचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (२ डिसेंबर) वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, नळदुर्ग येथील घरी रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा दाखल केले. पण, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या राजकीय-सामाजिक चळवळीमधील गेल्या ७ दशकांच्या स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. आयुष्यभर समाजहितासाठी झटलेले साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयाला देहदान केले जाणार आहे. ९ जुलै १९३३ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला होता. बार्शीत शाळेत असताना त्यांनी राष्ट्रसेवा दलात प्रवेश घेतला. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. तसेच, समाजप्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिताचे संपूर्ण शिक्षण घेतले.

पन्नालाल सुराणा यांनी ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक म्हणून आपली भूमिका बजावली. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची आणीबाणीत जेल भोगलेले समाजवादी नेते म्हणून देखील वेगळी ओळख आहे. जुना समाजवादी पक्ष, जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. मराठवाड्यात भूकंपात सर्वस्व गमावलेल्या व्यक्तींसाठी पन्नालाल यांनी सुरू केलेल्या ‘आपले घर’ मधून अनेक मुला-मुलींची आयुष्यं घडवली आहेत. त्याशिवाय भूमिहीन शेतक-यांना जमिनी मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला. समाजकारण आणि राजकारणामध्ये गुंतलेल्या व्यक्तीमध्ये लेखकही दडला आहे. ‘ग्यानबाचे अर्थकारण’ हे त्यांचे पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारे ठरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR