29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरटपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा

टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा

लातूर : प्रतिनिधी
मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग, कोविड रुग्ण आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा अतिरिक्त पर्याय असून ऐच्छिक स्वरुपाची असून हा पर्याय नाकारणा-या व्यक्तींना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. टपाली मतदानाचा पर्याय स्वीकारणा-या मतदारांचे मतदान त्यांच्या घरी जावून करून घेतले जाणार असून यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ मतदान पथके तयार करण्यात येणार आहेत.

मतदार यादीमध्ये नाव असलेले ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदार, मतदार यादीमध्ये दिव्यांग म्हणून नोंद असलेले आणि ४० टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कोविड-१९ मुळे रुग्णालयात दाखल किंवा क्वॉरंटाईन असलेले आणि ज्यांच्याकडे सक्षम आरोग्य अधिका-याचे प्रमाणपत्र आहे, अशा मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मतदारांना १२ (डी) फॉर्म मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) स्वत: भेट देवून वाटप करणार आहेत. ८५ वर्षेपेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार (दिव्यांगत्व प्रमाणपत्रासहीत) व कोविड रुग्ण (सक्षम आरोग्य अधिका-यांच्या प्रमाणपत्रासहीत) या मतदारांनी १२ (डी) फॉर्म बीएलओ यांच्याकडे जमा करावेत.

बीएलओ यांनी जमा केलेले १२ (डी) फॉर्म सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे १७ एप्रिल, २०२४ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. १२ (डी) फॉर्मची छाननी केल्यानंतर ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदारांची यादी, दिव्यांग मतदारांची यादी व कोविड रुग्ण मतदारांची यादी परिशिष्ट-१२ या नमुन्यात विधानसभा मतदारासंघनिहाय तयार केली जाईल. या यादीतील मतदारांना मतदान केंद्रावर जावून मतदान करता येणार नाही. संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची मतदान पथके हे या यादीतील मतदारांच्या घरी जावून टपाली मतदान करुन घेतील.

या मतदान पथकामध्ये २ मतदान अधिकारी, १ सूक्ष्म निरीक्षक, १ पोलीस अधिकारी व १ व्हिडीओग्राफर यांचा समावेश राहील. मतदान पथकाचे गृहभेटीचे वेळापत्रक तयार करुन तारीख व वेळेबाबत पूर्वकल्पना बीएलओमार्फतकिंवा एसएमएसद्वारे किंवा टपालाद्वारे पात्र मतदारांना देण्यात येईल. त्या दिवशी मतदान पथके पात्र मतदारांच्या घरी भेट देतील व त्यांचे टपाली मतदान करुन घेतील. फॉर्म नंबर १२ (डी) हा लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ँ३३स्र२://’ं३४१.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR