बारामती : प्रतिनिधी
मी कधीही माझी राजकीय भूमिका बदलत नाही आणि माझ्या भूमिकेबाबत कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी ती काढून टाकावी. डिलिमिटेशनच्या बिलावर ५० टक्के किंवा इतर काहीही असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार या बिलाच्या विरोधातच मतदान करणार असल्याचे सांगितले.
रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आहे, जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी टीकेला कामातून उत्तर दिले पाहिजे. धाडसी निर्णय घेत त्यांनी हे दाखवून दिले पाहिजे. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना बोलू देत नाहीत की काय, हे समजत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते पत्रकारांचा आवाज दाबतात, ते स्वत:च पक्षाचे अध्यक्ष आहेत असे वागतात.
डिलिमिटेशन बिलाबाबत बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले की, येत्या १७ तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. ज्या दिवशी हे बिल संसदेत सादर होईल, त्या दिवशी कोण विरोधात मतदान करते आणि कोण अचानक गायब होते, हे स्पष्ट होईल. आमचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मतदारसंघातील विकासकामे आणि शेतक-यांच्या प्रश्नांसाठी ही भेट होणार असून, पंतप्रधानांची वेळ मिळणे सोपे नसते. त्यामुळे या भेटीचा आणि बिलावरील मतदानाचा वेगळा अर्थ काढू नये; मतदानाच्या दिवशीच सर्वांचे पत्ते उघड होतील.
















