34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरतर ७५000 कोटी रुपये नद्याजोड प्रकल्पावर खर्च केले असते 

तर ७५000 कोटी रुपये नद्याजोड प्रकल्पावर खर्च केले असते 

लातूर : प्रतिनिधी
‘हर घर जल’ची दिशाभूल करणारी भाषा करणा-या भाजपा सरकारने ७५ हजार कोटी रुपये समृद्धी महामार्गावर खर्च केले. पिण्याचे पाणी, सिंचनाच्या पाण्यासाठी मात्र त्यांनी काहीच केले नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये काँगे्रस सत्तेत असती तर ७५ हजार कोटी रुपये समृद्धी महामार्गावर खर्च करण्याऐवजी तो पैसा नद्याजोड प्रकल्पावर खर्च करून नागरिकांसाठी, शेतक-यांसाठी पाण्याची उपलब्धता करून दिली असती, असे महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ दि. १ मे रोजी लातूर जिल्ह्यात आयोजित प्रचार सभांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोल लातूर दौ-यावर आले होते. त्या वेळी त्यांनी येथील काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, अमर खानापुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सुनील बसपुरे यांची उपस्थिती होती.
राज्यातील जनतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रचंड चिड आहे. भाजपाच्या खोट्या आश्वासनांना आता जनता कंटाळली आहे. निवडणुकीच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे, असे नमूद करून नानाभाऊ पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत काहीच केले नाही त्यामुळे त्यांना कामावर मते मागता येत नाही. परिणामी ते खोटे बोलून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. बेमोसमी पाऊस पडला. शेतक-यांचे नुकसान झाले. त्यांना काहीच मदत केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात पाण्याबाबत काहीच केले नाही. आता ते पाण्यावर बोलत आहेत.  विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मांजरा, रेणा, तावरजा नद्यांवर बराजेसची मालिका उभी केल्याने या भागातील शेतकरी  समृद्ध झाला आहे. काँग्रेस  फक्त बोलत नाही तर करून  दाखवतो.
खोकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लातूर पॅटर्न’चा भंगार पॅटर्न असा उल्लेख करून लातूरकरांचा व राज्यातील शिक्षण पद्धतीचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याचा काँग्रेस निषेध करते, असे सांगून पटोल म्हणाले, राहुल गांधी यांनी जाती जनगणनेचे आश्वासन दिले आहे. जातीनिहाय जनगणनेच्या आधारावर व्यवस्था निर्माण करणे हे लोकशाही देशाचे कर्तव्य आहे आणि तेच राहुल गांधी करणार आहेत.  भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामाचे काय झाले? मणिपूरचे काय झाले?, महिला कुस्तीपटूंवरील अन्यायाचे काय झाले?, वीरण्णा यांनी महिलांवर केलेल्या शोषणाचे काय झाले? याची उत्तरे द्यावीत. देश आणि देशाचे संविधान आज धोक्यात आहे त्यामुळे नागरिक आता मोदींचे ऐकायला तयार नाहीत. आता चारशे पार नाही, भाजपा तडीपार आहे, असेही पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR