देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा व चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने खरेदी केलेल्या बैलजोड्यांना देण्यात येणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.
देहूगाव ते चिंचोळी येथील पादुका मंदिरापर्यंत पालखी रथास जुंपण्याचा मान स्थानिक शेतक-यांच्या बैलजोडीला द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज स्थानिक शेतकरी मधुकर काळोखे यांनी संस्थानला दिला आहे. मात्र, संस्थानने स्वत:च बैलजोड्या घेऊन त्याच बैलजोड्या रथाला जुंपण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षीप्रमाणेच यंदाही पालखी रथासाठी दोन बैलजोड्या व चौघडागाडीसाठी एक अशा खिलार जातीच्या देखण्या, तंदुरुस्त आणि सक्षम तीन बैलजोड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही बैलजोड्या जुंपण्याचा प्रश्नच येत नाही.
यंदा सातारा जिल्ह्यातील बावधन गाव परिसर व कर्नाटक राज्यात या बैलजोड्यांचा शोध सुरू आहे. हा शोध घेताना त्या बैलांचे आरोग्य, क्षमता या निकषांसह निरीक्षण व परीक्षण करून खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वी परिसरातील शेतक-यांच्या बैलजोड्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांनी नाराज होऊ नये व संस्थानने घेतलेल्या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन विक्रमसिंह महाराज मोरे यांनी केले आहे.
















