धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्हयातील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. याठिकाणी धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीची लढत झाली. याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या २३६० मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार किर्तीमाला खटावकर यांचा पराभव केला. याठिकाणी तिरंगी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर या तिस-या स्थानावर राहिल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषदेच्या गटासाठी ११० पंचायत समितीच्या गणासाठी शनिवारी मतदान पार पडले. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली असून त्यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत.
धाराशिव तालुक्यातील तेर गटात चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याठिकाणी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या विजयी झाल्या. भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या दोन ३६० मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटील यांना ७ हजार ५९७ मते मिळाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांना ५ हजार २३७ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांना १ हजार २५३ मते मिळाली.
विशेष म्हणजे यापूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील पराभूत झाल्या होत्या. मात्र तेर गटातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये अर्चना पाटील यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर या तिस-या स्थानावर राहिल्या आहेत.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील या निवडणुकीत जिल्ह्याची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

