लातूर : लातूर जिल्हा परिषदेचे निकाल लागण्यास सुरुवात झाली असून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले खाते उघडले आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटामध्ये मनसेचे उमेदवार डॉ. सुनील नागरगोजे विजयी झाले आहेत, तर पंचायत समिती कोस्ट गाव येथे मनसेच्या श्रीदेवी गालफाडे, पानगाव येथे मोनिका रवी सूर्यवंशी या विजयी झाल्या आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील मिनी मंत्रालयाचा कारभार कुणाच्या हाती जाणार ? पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आज होत आहे.
नगरपालिका, महापालिकांपाठोपाठ या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुकांची निवडणुकीत चांगलीच गर्दी होती. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा, डिजिटल माध्यमांचा प्रचारासाठी वापर, आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. जवळपास तीन वर्षांपासूनचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासक राज सोमवारी संपत आहे. त्यातच आता लातूर जिल्हा परिषदेच्या मनसेने आपले खाते उघडले आहे.

