तामिळनाडूत घडविला इतिहास, विजय यांच्यासह १० जणांचा शपथविधी
चेन्नई : वृत्तसंस्था
जोसेफ विजय (थलपती) यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपालांनी विजय यांना मुख्यमंत्री आणि गोपनियतेची शपथ दिली. सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विजय यांच्यासोबत इतर ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ््यासाठी कॉंग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय यांनी शपथ घेताच टाळ््या, शिट्या वाजवून एकच जल्लोष केला.
तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या सोहळ््यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे राजकीय नेते, विजय यांच्या पक्षाचे हजारो कार्यकर्ते, आई-वडील, सिनेविश्वातील कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
या शपथविधी सोहळ््यात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासोबत थिरू एन. आनंद, आधव अर्जुन, अरुण राज, के. ए. सेंगोटैय्यन, पी. वेंकेटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि एन. कीर्तना ही एकमेव महिला यांच्यासह ९ मंत्र्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी तामिळनाडूतील जनहिताचा विचार करून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले.
निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास ५ दिवसांनंतर हा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जोसेफ विजय यांनी निर्णयाचा धडाका सुरू केला असून, पहिल्याच दिवशी प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करतानाच महिला सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स आणि अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा तातडीने करून मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या जनतेची मने जिंकली. या निर्णयांमुळे तामिळनाडूच्या राजकारणात आणि प्रशासनात ‘थलपती’ स्टाईलने एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

