नागपूर : प्रतिनिधी
दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता मिचॉन्ग चक्रीवादळामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. आस्मानी संकटामुळे कापूस, धान, संत्रा, द्राक्ष, कांदा, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वच पिके हातची गेल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतक-यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्या, अशी जोरदार मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना मंत्री शेतक-यांच्या बांधावर फिरकलेदेखील नाहीत तर मुख्यमंत्री निवडणूक प्रचारात व्यस्त होते, अशी टीकाही त्यांनी केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरूवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विजय वडेट्टीवार यांनी नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त शेतक-यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेत त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी करीत सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना सरकारने फक्त ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला त्यामुळे याच तालुक्यांना आर्थिक मदत मिळणार आहे मात्र, आम्ही मागणी केल्यानंतर सरकारने १ हजार २१ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केला; पण केंद्र सरकारकडे या दुष्काळी मंडळांसाठी मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे या महसुली मंडळांना आर्थिक मदत मिळणार नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तसेच सभागृहातील कामकाज बाजूला सारून उद्ध्वस्त शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करा आणि आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतक-यांना कर्जमुक्त करा, अशी जोरदार मागणी वडेट्टीवार यांनी केली.
हा तर हात झटकण्याचा प्रयत्न
राज्य सरकार दुष्काळसदृश परिस्थिती, असा नवीन शब्दप्रयोग करीत असून सरकारने मदतीसाठी हात वर केले आहेत. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत; पण पंचनामे होत सुरू नाहीत तसेच सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती, असा आरोपही त्यांनी केला.